गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी

गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करताय ना! अहो थोडेच दिवस राहिलेत. घरी पाहुणा येणार म्हणलं की कामांची लगबग ही असतेच ना !
त्यात गणपती बाप्पा सगळ्यांचाच लाडका मग त्याच्या तयारीत काही कमी/ उणीव राहू नये म्हणून कंबर कसली पाहिजे, नाही का?

काय तयारी लागते बरं नेमकी. ढोबळमानाने आपण याचे दोन भाग करूया, एकात येईल बाप्पा च्या पूजेची तयारी आणि दुसरा भाग असेल ,आपली सोय म्हणजे बाप्पाला करायचा नैवेद्य. बाप्पाला दाखवून केलेला प्रसाद आपणच खाणार ना मग त्याची देखील सोय बघायला हवी ना ?
साधारणतः आठ दिवस किंवा आपल्या सोयीने दोन दिवस आधी आपण बाप्पाच्या बैठकीसाठी आसन किंवा छोटी छोटी सजावट करू शकतो. त्यासाठी जितक्या नैसर्गिक, इकोफ्रेंडली वस्तू वापरू तेवढ्या चांगल्या.
रंगीत जाड कागद, जिलेटीन पेपर, घोटीव कागद, आईस्क्रीमचे पातळ चमचे,रंगीत काड्या,साधी रांगोळी,धान्याची रांगोळी किंवा फुलांची रांगोळी हे पर्याय देखील आहेत. फुलांची रांगोळी मात्र अगदी ऐन वेळी करावी लागेल.
ही सजावट आणि मध्ये बैठक म्हणून छोटा चौरंग ठेवला की बाप्पा बसायला तयार...

पूजेच्या तयारी मध्ये ज्याला पंचामृती पूजा म्हणलं जातं ती तयारी खरंतर सोपी आहे.
हळदी कुंकू,फुले,रांगोळी, सुपार्‍या,बदाम,खारका,फळे सगळं प्रत्येकी 5, पाच जोडी म्हणजे दहा विड्याची पाने, दुर्वा(हरळी), तुळस,बेल,छानसा फुलांचा,मोत्याचा,कापसाच्या वस्त्राचा हार,उदबत्ती,सुट्टे पैसे दहा नाणी,अत्तर,जानव्याचा जोड,पळी-भांडं-ताम्हण नसल्यास छोटी खोलगट डिश आणि चमचा देखील आपण ताम्हण आणि पळी म्हणून वापरू शकतो.
अजून एक महत्त्वाची वस्तू म्हणजे गंध.जे चंदनाचे सहाणेवर उगाळून केले जाते ते किंवा बाजारातील तयार अष्टगंध. अक्षता म्हणजे अ-क्षत सोप्या भाषेत तांदळाचा तुकडा नाही तर तांदुळाचा दाणा पूर्ण असलेला तांदूळ हा अक्षता तयार करण्यासाठी वापरला जातो. तांदूळ हलकेसे ओले करून त्यावर कुंकू टाका,त्याला हलका लालसर गुलाबी रंग येऊ दिला, हे तांदूळ वाळले की झाल्या अक्षता तयार.
याच पूजेमध्ये लागणाऱ्या अजून दोन महत्वाच्या वस्तू म्हणजे पंचखाद्य आणि पंचामृत. पंचखाद्य हे पाच वस्तू एकत्र करून बनवला जाणारा पदार्थ आहे, ज्या वस्तू कोणत्याही स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होऊ शकतात. खारीक,खसखस,खोबरं आणि खडीसाखर समप्रमाणामध्ये जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा पंचखाद्य बनवणं सोपं जातं.
खारीक किंवा खारकेची पूड करून घ्यावी,खसखस हलकीशी भाजून त्याची देखील भरड अशी पूड करावी,गोटा खोबरं किसून घेऊन हलकसं भाजून घ्यावं ते हाताने देखील बारीक होतं, त्याचे हलकेसे जाड पावडर मध्ये रूपांतर होते, खडीसाखरेचे दाणे बारीक असतील तर डायरेक्ट वापरा नसल्यास साखर किंवा पिठीसाखर देखील चालतेच.सगळं एकत्र केलं की झालं पंचखाद्य तयार .

एक ओपन सिक्रेट सांगू का? याच पंचखाद्यात गूळ आणि ओलं खोबरं मिसळून गॅसवर ठेवून छान चटका दिलात तर मोदकांचं सारण तय्यार की !!

दुसरा पदार्थ आहे पंचामृत.
पाच ओले पदार्थ एकत्र केले असता जे अमृतासारखे लागतात किंवा अमृतासारखी शक्ती देतात म्हणून त्याला पंच-अमृत 'पंचामृत' म्हणाले जाते. यात दूध,तूप,मध,दही आणि साखर यांचा समावेश असतो.
पंचामृत तयार करण्यासाठी दूध अर्धी वाटी,दोन चमचे दही,मध एक चमचा,तूप दोन चमचे व साखर दोन चमचे इतकेच साहित्य लागते.
आपला गणपतीबाप्पा खरंच सोपा आहे,आपल्याला तो फार त्रासात टाकत नाही, त्याला 'पूजा करणाऱ्यांचा भाव महत्त्वाचा वाटतो निव्वळ वस्तू न्हवेत'.
अशी पूजेची तयारी झाली की देवासमोर बसायला पाट किंवा आसन घेतलं की आपण पूजेसाठी अगदी तयार आहोत. हा पण छानशी साडी नेसून किंवा मस्तपैकी झब्बा,सोवळं घातलं की तुम्ही तयार झाला आहात.
बाकी नैवेद्य जो तुम्ही कराल तो अगदी घरात कोणी आजारी असेल, घरातल्या आई- बाईचीच तब्येत ठीक नसेल, शक्य नसेल तर बापाला गूळ-खोबरं, दूध -साखर हेदेखील प्रसाद म्हणून आनंदाने चालतं. बाकीचे नैवेद्याचे पदार्थ हे आपल्या जिभेला आणि पोटाला तृप्त करण्यासाठीच असतात बरं!

वेगवेगळ्या प्रकारचे मोदक हे गणपतीच्या दिवसांमधील सर्वांचे आवडते.बाप्पांच्या बरोबर उंदीर मामा चे पण लाडके तेच. मोदकांमध्ये वरचे कव्हर हे तांदुळाच्या पिठाची उकड काढून केलेले असतील तर ते उकडीचे मोदक,भिजवलेली कणिक वापरून तळलेले असतील तर ते तळणीचे मोदक आणि आत सारण म्हणून तर तुम्ही जे पाहिजे ते घालू शकता.
गुळ आणि ओलं खोबरे या पासून बनवले जाणारे सारण हे तर सर्वांनाच आवडते, पण ड्रायफ्रूट,काजू,खजूर असे अनंत प्रकार करता येतील यात. जशी तुमची आवड तसा मोदक तयार.

या दिवसांच्या दरम्यान तुम्हाला मोदक करायला जमणार नसतील तर असंख्य हात आपल्या मदतीला आहेतच. हलवाई,मिठाईवाले,घरगुती शेफ मग काळजी कसली!
सगळ्या प्रकारचे मोदक तुम्हाला चुटकीसरशी मिळतील आणि घरातल्या सगळ्या वयातल्या व्यक्तींना तृप्त करतील.

गणपती काय किंवा कोणताही देव,परंपरा,सण हे आपल्या आनंदासाठी म्हणून जर केले तर त्याचं बर्डन किंवा ओझं न वाटता या परंपरांचा-सणांचा आनंद नक्कीच घेता येईल. अर्थात सार्वजनिक गणपती मुळे होणारी रस्त्यावरील वाहतूक कोंडी,आवाजाचे प्रदूषण या गोष्टींकडे थोडेसे दुर्लक्ष करून आपल्या घरांमधील बाप्पाच्या येण्याचा आनंद जर आपण आपले जवळचे नातेवाईक,मित्रमंडळी यांच्या बरोबर वाटून घेतला तर सोन्याहून पिवळे!

एक गोष्ट मात्र अत्यंत महत्त्वाची आहे जी गणपती या देवाबद्दल नेहमी ऐकायला मिळते.अतिशय हसमुख असा हा देव आहे. आपल्या मोठ्या पोटाचा,लांब सोंडेसारख्या नाकाचा, बुटक्या शरीरयष्टीचा कशाचा म्हणून त्याला कॉम्प्लेक्स नाही तेव्हा त्याच्याकडून आपण नक्कीच आपल्या शारीरिक उणिवांवर मात कशी करायची आणि मजेत कसं जगायचं हे शिकण्याचा प्रयत्न करू शकतो.

जैसे भी है हम सुंदरही है।

गणपती बाप्पा मोरया!!

कामाक्षी बर्वे.
विटा-सातारा-पुणे